
व्याजाने पैसे देणाऱ्या सावकाराला पोलिसांनी केली अटक
पुणे लाईव्ह I १ डिसेंबर २०२२ I बेकायदेशीरपणे सावकारकी करत दहा टक्के व्याजाने पैसे उकळणाऱ्या एका खाजगी सावकाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. एका व्यक्तीने घेतलेल्या कर्जावर अधिकचे पैसे दिल्यानंतरही आणखी पैसे मागत त्याला या सावकाराने शिवीगाळ केली होती. योगेश पंडित भालेराव (वय 27, रा. गोकुळ नगर, बाजारपेठ, लोहगाव रोड, धानोरी) असे या खाजगी सावकाराचे नाव आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की एका व्यक्तीने योगेश पंडित यांच्याकडून एप्रिल 2021 मध्ये दोन लाख रुपये आणि फेब्रुवारीमध्ये दोन लाख रुपये असे चार लाख रुपये दहा टक्के व्याज दराने घेतले होत. या पैशाच्या बदल्यात त्याने ऑगस्ट 2022 पर्यंत चार लाख 80 हजार रुपये परत केले होते. मात्र असे असतानाही योगेश पंडित यांनी फिर्यादी व्यक्तीला फोन करून शिवराय केली आणि टेम्पो ताब्यात घेण्याची धमकी देऊन आणखी चार लाख 80 हजार रुपयांची मागणी केली होती. दरम्यान फिर्यादीने याची माहिती पोलिसांना दिली होती. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या खाजगी सावकाराला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.