
मुलगा सुनेने केली ४६ लाखांची फसवणूक ; गुन्हा दाखल
पुणे लाईव्ह I ७ डिसेंबर २०२२ I मुलगा आणि सुनेने फसवणूक करत 46 लाख रुपये लाटल्याची तक्रार एका 82 वर्षे ज्येष्ठ महिलेने केली आहे. न्यायालयीन कामकाजासाठी सह्या लागत असल्याची बतावणी करून या वृद्ध महिलेच्या बँक खात्यातील 46 लाख रुपयांची रोकड काढून घेतली. याप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आता बाळासाहेब मारूती टिळेकर, मिलिंद मारूती टिळेकर यांच्यासह तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ महिला मुंढव्यातील केशवनगर भागात एका वाड्यात एकट्याच राहतात. त्यांना चार मुले आहेत. ज्येष्ठ महिला लहान मुलाकडे राहायला आल्या होत्या. तर त्यांची तीन मुले विचारपूस करत नव्हती. दरम्यान, आईला माहेरहून पैसे मिळणार असल्याची कुणकुण मुलगा बाळासाहेब, मिलिंद व त्यांच्या सूनांना लागली. त्यानंतर त्यांनी दोघांनी आईशी गोड बोलून तिचा विश्वास मिळविण्याचा प्रयत्न केला.
मोठ्या मुलाने त्यांना त्याच्या घरी राहण्यासही नेले. दरम्यान, एप्रिल 2012 मध्ये न्यायालयाच्या आदेशाने वडिलांच्या मिळकतीचे 60 लाख रुपये त्यांच्या आईच्या बँक खात्यात जमा झाले. त्या वेळी मुलांनी न्यायालयाच्या बाहेर आईच्या सह्या कागदपत्रांवर घेतल्या. 2015 मध्ये ज्येष्ठ महिलेला हदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात पैसे भरण्यासाठी त्यांनी बँकेतून अडीच लाख रुपये काढले. तेव्हा बँक खात्यातून परस्पर 46 लाख रुपये काढण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मुलांना पैशांबाबत विचारणा केली, तेव्हा मुलांनी त्यांच्यावरच अरेरावी केली. त्यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.