
सोशल मीडियाच्या माध्यमातून अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्याला अटक
पुणे लाईव्ह I ३ डिसेंबर २०२२ I इंस्टाग्राम या सोशल मिडीयाच्या माध्यमातून अंमली पदार्थ विकणाऱ्याला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही करवाई अंमली पदार्थ विरोधी पथक एक यांनी गुरुवारी केली आहे.यावेळी आरोपीकडून पोलिसांनी 76 हजार रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत.
स्वप्नील विकास बनसोडे (वय 28 रा.डेक्कन) असे अटक आरोपीचे नाव आहे. एक जण इनस्टाग्रामवरून अंमली पदार्थ विकत आहे याची खबर पोलिसांना आधीच लागली होती. त्याचा शोध घेत असताना स्वप्नील तो व्यक्ती असून तो गोखले इन्सटीट्यूट, डेक्कन येथे असल्याची खबर पोलिसांना मिळाली, त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावून स्वप्नीलला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून पोलिसांना 76 हजार 670 रुपयांचा 2 किलो 333 ग्रॅम वजनाचा गांजा, 30 ग्रॅम 70 मिलीग्रॅम वजनाचे ओलसर चरस मिळाला. तसेच गुनह्यात वापरलेली दुचाकी व इलेक्ट्रीक वजन काटा असा एकूण 1 लाख 28 हजार 170 रुपयांचा एवज जप्त करण्यात आला.आरोपीवर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपासासाठी डेक्कन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.