
थेरगाव येथे पाणीपुरवठा विस्कळीत; सांगवीत देखील कमी दाबाने पाणी
पुणे लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२२ । थेरगाव परिसरात शनिवारी (दि.२९) पहाटे पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. या ठिकाणी जवळपास दोन तास व्हॉल्व दुरुस्तीचे काम सुरु होते. त्या दरम्यान, जलवाहिनीचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे रस्ता जलमय झाला होता. दरम्यान, सांगवी परिसरातही आज कमी दाबाने पाणीपुरवठा झाला.
रावेत येथील बंधार्यातून अशुद्ध पाणी उचलून निगडीतील सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रास पुरवठा करणारी वाहिनी बुधवारी (दि. २६) फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी गळती झाली होती. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा ऐन दिवाळीमध्ये सलग दोन दिवस विस्कळीत झाला होता.
तसेच, शनिवारी देखील थेरगाव येथे व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे वाहिनीतून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती झाली. त्यामुळे पहाटे दहाच्या सुमारास डांगे चौक-बिर्ला रुग्णालय रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. जवळपास दोन तास व्हॉल्व दुरुस्तीचे काम सुुरु होते. त्यामुळे परिसरात उशिरा पाणीपुरवठा झाला. परिसरातील सकाळचा पाणीपुरवठा देखील विस्कळीत झाला तसेच, सांगवी परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून महापालिका पाणीपुरवठा विभागाकडे करण्यात आल्या आहेत.