PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

कात्रज घाटात रिक्षा चालक महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न

पुणे लाईव्ह I 30 डिसेंबर २०२२ I रिक्षात बसलेल्या प्रवाशाला घेऊन निघालेल्या रिक्षा चालक महिलेवर प्रवाशानीच अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कात्रज घाटात 26 डिसेंबरच्या रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी 38 वर्षीय रिक्षा चालक महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपीला अटक करण्यात आले आहे. निखिल अशोक मेमजादे (वय 30, रा. शंकर मठ हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या प्रवाशाचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिला या रिक्षा चालक आहेत. 26 डिसेंबरच्या रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आरोपी कात्रज परिसरातून प्रवासी म्हणून त्यांच्या रिक्षात बसला होता. त्याने फिर्यादी महिलेला कात्रज घाटात जायचे आहे असे सांगून त्या दिशेने रिक्षा घेऊन गेला. दरम्यान कात्रज घाटातील एका लॉजिंग जवळ रिक्षा थांबून महिलेला जेवणासाठी तो जबरदस्ती करू लागला. मात्र या महिलेने नकार दिल्यानंतर आरोपीने तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी महिलेने विरोध केला असता तिला मारहाण केली आणि तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली.

फिर्यादी महिला नकार देत असताना आरोपीने सर्व कपडे काढून नग्न अवस्थेत रिक्षात बसला. त्याच्या अशा वागण्याने फिर्यादी महिला घाबरली आणि रिक्षातून खाली उतरून ती कात्रज घाटात पळत सुटली. आरोपीने देखील नग्न अवस्थेत या महिलेचा पाठलाग सुरू केला.रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कात्रज घाटात घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करत आहे.