
शस्त्राने जखमी करून आयफोन लांबविला
पुणे लाईव्ह I 30 डिसेंबर २०२२ I मित्रा सोबत गप्पा मारत असताना व्यावसायिकाला टोकदार शस्त्राने जखमी करून त्याच्या हातातील आय फोन 11 प्रो हा हिसकावून नेला आहे. ही घटना तळेगाव दाभाडे येथील टेल्को कॉलनी येथे सायंकाळी साडे सात वाजता घडली.
या प्रकरणी आशिष भाऊ गायकवाड (वय 32 रा. तळेगाव स्टेशन) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चार जणांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचा मित्र सुनील याच्याशी टेल्को कॉलनी तुळजाभवानी मंदिरामागे गप्पा मारत उभे होते. यावेळी आरोपी दुचाकीवरून आले व त्यांनी टोकदार शस्त्राने फिर्यादीला मारून जखमी केले. तसेच फिर्यादीच्या हातातील 20 हजार रुपयांचा आय फोन 11 प्रो जबरदस्तीने हिसकावून पळून गेले. यावरून तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.