PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

पुण्यात तरुणावर गोळीबार करून शस्त्राने हल्ला

पुणे लाईव्ह I २९ डिसेंबर २०२२ I पूर्ववैमनस्यातून गोळीबार करत एका तरुणावर कोयत्यानं वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं पुणे शहरात घबराटीचं वातावरण निर्माण झालं असून त्यानतंर पोलिसांनी मंडई परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याशिवाय पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

जखमी तरुण शेखर शिंदे हा पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या महात्मा फुले मंडईतील रामेश्वर चौकातून रात्री नऊच्या सुमारास जात होता. त्यावेळी त्याच्यामागून दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार करत कोयत्यानं वार करायला सुरुवात केली. यावेळी तरुणानं आरडाओरडा केल्यानंतर उपस्थितांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

त्यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी झालेल्या शेखर शिंदेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करत प्रकरणाची चौकशी करायला सुरुवात केली आहे. पोलिसांनी घटनास्थळाची चौकशी केली असून आरोपींनी ज्या मार्गावरून पळ काढला आहे, त्या मार्गावरील सीसीटीव्ही फूटेज चेक केलं जात आहे. गंभीर जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात गु्न्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.