
कारागिरांनी 29 तोळे सोन्याची बिस्किटे लांबविली
पुणे लाईव्ह I २० डिसेंबर २०२२ I दागिने बनवून देणाऱ्या कारागिरांनी 29 तोळे सोन्याची बिस्किटे दागिने बनविण्यासाठी घेतली. बिस्किटे घेऊन कारागीर बेपत्ता झाले. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 7 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत नढेनगर काळेवाडी येथे घडला.
किसन रेवजी तांबे (वय 51 , रा. नढेनगर, काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सॅम्युअल हरजोली हक उर्फ दिपू शेख, रॉनी ताजोद्दीन शेख (सध्या रा. नढेनगर, काळेवाडी. मूळ रा. पश्चिम बंगाल) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे सोन्याचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात आरोपी कारागीर म्हणून काम करत होते. तांबे यांनी विश्वासाने आरोपींकडे 16 लाख 64 हजार 883 रुपये किमतीचे 231.152 ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे दागिने बनविण्यासाठी दिली. कारागीर आरोपींनी त्या बिस्किटांचे दागिने बनवून न देता घर सोडून पळ काढला. त्यांच्या मोबाईलवर संपर्क केला असता तो बंद सांगत असल्याने याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत
