PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

कुस्तीगीरांच्या मानधनात घसघशीत वाढ: आमची कुस्ती ही स्क्रीनवर; आमच्यातील महाराष्ट्र केसरी हा राज्याचा मुख्यमंत्री: देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रातील कुस्तीगीरांचे मानधन खुपच कमी आहे. त्यामुळे ऑलिम्पिक आणि जागतिक स्पर्धेतील कुस्तीगीराला ६ ऐवजी २० हजार, हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी आणि रुस्तम ए हिंद विजेत्याला ४ ऐवजी १५ हजार, अर्जुन पुरस्कार प्राप्त कुस्तीगीराला ६ ऐवजी २० हजार तर वयोवृद्ध कुस्तीगीराला अडीच ऐवजी साडेसात हजार रुपये मानधन दिले जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी क्रीडामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रूज भूषण शरण सिंह, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस, राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष योगेश दोडके, जिल्हा संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे, आयोजक मुरलीधर मोहोळ, हिंद केसरी अभिजित कटके यांसह मान्यवर उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, या स्पर्धेला महिला प्रेक्षकांची मोठी संख्या आहे. महिला आता प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने याबाबत पुढाकार घेऊन महाराष्ट्र महिला केसरी स्पर्धा भरवावी. त्याला महाराष्ट्र सरकार सर्व आर्थिक सहाय्य करेल, अशी घोषणा ही त्यांनी यावेळी केली.
.
ब्रीज भूषण म्हणाले, सन १९६१ पासून महाराष्ट्राने एकही ऑलिम्पिक पदक जिंकलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील मल्लाना पुढे आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सहकार्य करावे. तसेच महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याबाबत ही पुढाकार घ्यावा.

तडस म्हणाले, महाराष्ट्राला पहिले पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव यांना केंद्र सरकारने पद्माश्री जाहीर करावा. तसा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने केंद्राला पाठवावा. तसेच कुस्तीगीरांचे मानधन वाढवावे आणि प्रत्येक तालुका आणि जिल्हा कुस्ती संकुलाला शासनाच्या वतीने मॅट द्यावी, अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली. या प्रसंगी चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुरलीधर मोहोळ यांनी केले.

आमची ही कुस्ती स्क्रीनवर
आम्ही राजकारणी सुद्धा कुस्ती करीत असतो. आमची कुस्ती रोज टीव्ही स्क्रीनवर दिसते. पण आमच्यातील महाराष्ट्र केसरी हा राज्याचा मुख्यमंत्री होत असतो, अशी टिपण्णी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.