
सांगवी येथे पत्नीचा गळा दाबून खून ; आरोपीला अटक
पुणे लाईव्ह I ४ डिसेंबर २०२२ I घरगुती वादातून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. ही घटना गुरुवारीरात्री शारदा कॉलनी, पिंपळे निलख येथे घडली. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे.
आश्विन वसंतराव बडदे (वय 40, रा. शारदा कॉलनी, पिंपळे निलख) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी खून झालेल्या 34 वर्षीय महिलेचे वडील सूर्यकांत वामनराव मेमाने (वय 60, रा. कदम वाकवस्ती, ता. हवेली) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आश्विन हा फिर्यादी यांचा जावई आहे. आश्विन आणि फिर्यादी यांच्या मुलीचे घरगुती कारणावरून गुरुवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास भांडण झाले होते. त्या भांडणाच्या कारणावरून त्याने पत्नीचा गळा दाबून खून केला. पोलिसांनी आश्विन याला ताब्यात घेतले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.