
रेल्वे मार्गावर फोटोशूट व रील बनवणाऱ्या दोघांना अटक
पुणे लाईव्ह | २६ नोव्हेंबर २०२२ | रेल्वे मार्गावर फोटोशूट व रील बनवणाऱ्या दोघांना चिंचवड रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.ही कारवाई बुधवारी (दि.23) केली.
विक्रम सिंह जोधसिंह राठौड (वय 25), महेशभाई रत्नाभाई रबारी (वय 18, दोघे रा. भीमाशंकर नगर, मुकाई चौक, रावेत, देहूरोड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेगडेवाडी-देहूरोड रेल्वे स्थानकादरम्यान बुधवारी (दि. 23) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास विक्रम आणि महेशभाई हे दोघे रेल्वे ट्रॅकवर फोटोशूट करत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक ए के यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक डी एन लाड, कर्मचारी बी पी पवार, समाधान बागुले यांनी तात्काळ धाव घेऊन दोघांना ताब्यात घेतले.
विक्रम आणि महेशभाई हे दोघेजण रेल्वे ट्रॅकवर पुशअप्स तसेच वेगवेगळ्या पोझमध्ये झोपून, चालून फोटो, व्हिडीओ काढत होते. ते फोटो, व्हिडीओ त्यांना सोशल मीडियावर अपलोड करायचे असल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे. याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेल्वे ट्रॅकवर फोटो, व्हिडीओ काढणे, रेल्वे ट्रॅक ओलांडणे हे धोकादायक आहे. नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे अपघात होऊन त्यात अनेकांचा मृत्यू होतो. असे मृत्यू टाळण्यासाठी रेल्वे विभागाने मिशन झिरो डेथ अभियान सुरु केले आहे.
