
शिंदेसेनेचा गड कोसळतोय? 33 पदाधिकारी बाहेर, राजकीय खळबळ
रायगड जिल्ह्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. पक्षातील अंतर्गत नाराजी उफाळून आल्याने उरण आणि पनवेल भागातील तब्बल 33 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिला आहे.
राज्यात महापालिका निवडणुकांची तयारी सुरू असताना रायगड जिल्ह्यात शिंदे शिवसेनेतील असंतोष उघड झाला आहे. उरण विधानसभा मतदारसंघातील जिल्हाप्रमुख अतुल भगत यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी विनोद साबळे यांची नियुक्ती करण्यात आली. या निर्णयामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली.
या पार्श्वभूमीवर उरण तालुकाप्रमुख दीपक ठाकरे, पनवेल तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील यांच्यासह एकूण 33 पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या सचिवांकडे सामूहिक राजीनामे सादर केले आहेत.
राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे की, पक्षवाढीसाठी सातत्याने मेहनत करणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्या व्यक्तींना महत्त्वाची पदे देण्यात आली. कोणतीही चर्चा न करता परस्पर निर्णय घेतले जात असल्याने पक्षात अन्याय होत असल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणात आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर मनमानी आणि एकाधिकारशाही कारभार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांची बाजू न ऐकता थेट नियुक्त्या केल्या गेल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी वाढल्याचे सांगण्यात येत आहे.
ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे शिवसेनेतील हे नाराजीनाट्य पक्षासाठी अडचणीचे ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे पक्षप्रवेश सुरू असताना दुसरीकडे निष्ठावंत पदाधिकारी राजीनामा देत असल्याने शिंदेसेनेसमोर संघटनात्मक आव्हान उभे राहिले आहे.