PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

कोंढवा येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण

पुणे लाईव्ह I ७ डिसेंबर २०२२ I वीजबिलांच्या थकबाकीमुळे घरगुती विजेचा पुरवठा खंडित केल्याच्या कारणावरून महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कोंढवा येथील चार आरोपींविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

 

याबाबत माहिती अशी की, महावितरणच्या रास्तापेठ विभाग अंतर्गत कोंढवा शाखा कार्यालयाचे जनमित्र शंकर रामकिसन रोंढे हे सहकारी सिद्धार्थ चव्हाण यांच्यासमेवत सोमवारी (दि. 5) कोंढवा येथील भाग्योदयनगर परिसरात दुपारी वीजबिलांची थकबाकी असणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे सरकारी कर्तव्य बजावत होते. यामध्ये हजरा कॉम्प्लेक्समधील चार घरगुती थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला व मीटर काढून दोघेही कर्मचारी कार्यालयाकडे निघाले होते.
मात्र कोंढवा येथील अफजल कादर कपाडिया, असिफ कादर कपाडिया, मोहमद अफजल कपाडिया व एक अनोळखी इसम यांनी जनमित्र श्री. रोंढे व श्री. चव्हाण यांना अडवून वीजमीटर हिसकावून घेतले व दोघांनाही मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली.