PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

कोल्हापूर : गोकुळ शिरगाव येथील केमिकल कंपनीला भीषण आग

कोल्हापूरजवळील गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथील थर्मोकेम केमिकल कंपनीला आज (दि. १४) दुपारी चारच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. संपूर्ण कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. सगळीकडे मोठे धुराचे लोट दिसत आहेत.

दोन तासांपासून आग विझविण्याचे काम सुरू आहे. कोल्हापूर महानगरपालिका, कागल नगरपालिका, विमानतळ, शाहू साखर कारखाना, कागल एमआयडीसी अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

केमिकल कंपनी असल्याने सिलेंडरचे मोठ मोठे स्फोट येथे होत असून गेल्या एक तासापासून ही आग येथे धगधगत आहे. यात जीवित हानी किती झाले आहे अद्याप समजू शकले नसून कंपनीचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. तसेच नागरिकांना परिसरातून सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम सुरू आहे.

पेट्रोलियम कंपनीमुळे धोका :

आग लागलेल्या कंपनीचे Ceraflux India प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असे नाव आहे. ही कंपनी कोल्हापुरातील गोकुळ शिरगाव एमआयडीसी परिसरात असून येथे केमिकल पेट्रोलियम चे काम होत दुपारच्या सुमारास अचानक येथे आग लागली असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

आजूबाजूला देखील केमिकल आणि पेट्रोलियमचे कंपन्या असल्याने आजूबाजूच्या कंपन्यांना देखील मोठा धोका येथे सध्या उद्भवला आहे. तर परिसरातील विद्युत पुरवठा देखील सध्या खंडित करण्यात आलेला आहे. आगीचे लोट इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत की पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून देखील स्पष्टपणे दिसत आहे. बाजूलाच कोल्हापूर विमानतळ असल्याने विमान वाहतुकीवर देखील परिणाम होण्याची शक्यता येथे निर्माण झाली आहे.