
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी दोन नेत्यांचा राजीनामा, भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) मोठा धक्का बसला आहे. मनसेच्या माजी नगरसेविका कस्तुरी कौस्तुभ देसाई आणि माजी शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई यांनी एकाचवेळी पक्षाच्या पदाचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
कस्तुरी देसाई या मनसेच्या महिला शहर अध्यक्षा होत्या. मागील महापालिका निवडणुकीत त्या फ्लॉवर व्हॅली प्रभागातून नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. तर कौस्तुभ देसाई यांनी पक्षाच्या स्थापनेपासून मनसेत विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या असून, शहर अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली होती.
दोघांनीही राज ठाकरे यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात सांगितले की, समाजकारण आणि राजकारणातील प्रवास हा गुरु, सहकारी कार्यकर्ते, नागरिक आणि मार्गदर्शक यांच्या मतांचा आदर ठेवून घेतलेला वैयक्तिक निर्णय आहे. पक्षाविषयी कोणतीही नाराजी किंवा गैरसमज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मनसेकडून मिळालेल्या संधी आणि मार्गदर्शनाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
दरम्यान, या दोघांचा भाजपात प्रवेश होण्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सध्या केडीएमसी परिसरात मनसेसह विविध पक्षांतील माजी नगरसेवकांचा भाजप आणि शिंदेसेनेत प्रवेश होत असल्याचे चित्र दिसत आहे.
याआधी काही दिवसांपूर्वी मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर आणि सरोज भोईर यांनीही पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे कल्याणमध्ये मनसेची संघटनात्मक ताकद कमी होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.