
जैन हिल्स येथे पाच दिवसीय ‘नवीन आहार पद्धती व आरोग्य संवर्धन शिबिरा’चा शुभारंभ
आधुनिक जीवनशैलीत चुकीच्या आहारामुळे वाढत चाललेल्या आजारांवर मात करण्यासाठी जळगाव शहरातील जैन हिल्स येथे पाच दिवसीय नवीन आहार पद्धती व रोगनिदान (आरोग्य संवर्धन) शिबिराचा शुभारंभ झाला. बडी हंडा सभागृहात पार पडलेल्या उद्घाटन समारंभात मार्गदर्शक बी. व्ही. चव्हाण यांनी “अयोग्य आहार हेच आजारांचे मूळ असून योग्य आहार स्वीकारल्यास अनेक व्याधी मुळातून दूर होऊ शकतात,” असा ठाम संदेश दिला.
या शिबिराचे उद्घाटन जैन फार्म फ्रेश फुड्सचे वरिष्ठ अधिकारी सुनील गुप्ता, हरिद्वार येथील महामंडलेश्वर गिरीधर गिरी महाराज, कानळदा येथील कण्व आश्रमाचे अद्वैतानंद सरस्वती महाराज आणि मार्गदर्शक बी. व्ही. चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपक चांदोरकर यांनी गुरुवंदना सादर केली, तर सरोज चव्हाण यांनी ईशप्रार्थना घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मोनिका भावसार यांनी केले.
या शिबिराचे आयोजन जैन इरिगेशनचे सहकारी तसेच शहरातील मान्यवरांसाठी करण्यात आले आहे. शिबिराची संपूर्ण रुपरेषा व आवश्यक सूचना कंपनीचे सहकारी सुचेत जैन यांनी उपस्थितांना दिल्या.
उद्घाटनानंतर मार्गदर्शक बी. व्ही. चव्हाण यांनी आपल्या जीवनातील संघर्षमय अनुभव कथन करत उपस्थितांना अंतर्मुख केले. “लहानपणापासून मला पोटाचे तीव्र विकार होते. विविध पॅथींचे उपचार करूनही आराम मिळाला नाही. वयाच्या ४५व्या वर्षी आजाराला कंटाळून आत्महत्येचा विचारही मनात आला. मात्र त्याच वेळी ‘न्यू डायट सिस्टीम’ स्वीकारली आणि हळूहळू पोटाचा आजार पूर्णपणे बरा झाला,” असे त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले.
आज वयाची ८० वर्षे पूर्ण करूनही बी. व्ही. चव्हाण देश-विदेशात फिरून आरोग्य व आहारावर मार्गदर्शन करत आहेत. रामायण-महाभारत काळातील अन्नसंस्कृतीचा उल्लेख करत त्यांनी कंद, मूळ, फळे, फुले, पाने, हवा, प्रकाश आणि आकाश हे नऊ घटक मानवी आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले.
“पेट्रोलच्या गाडीत डिझेल भरले तर इंजिन बिघडते; त्याचप्रमाणे शरीराला न शोभणारा आहार घेतल्यास आजार अटळ आहेत,” असे प्रभावी उदाहरण देत त्यांनी ‘आहार हेच आरोग्य आणि चुकीचा आहार हेच अनारोग्य’ हे सूत्र मांडले.