PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

महत्वाची बातमी: पुणे मेट्रोच्या कामामुळे निर्णय; खडकीतील वाहतुकीत बदल

पुणे लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२२ । पुणे शहरातील मेट्रोच्या कामासाठी खडकीतील चर्च चौक भुयारी मार्ग आणि पोल्ट्री चौकातील भुयारी मार्ग परिसरात शनिवारपासून (दि. २४) वाहतूकीत बदल करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दिली आहे.

मुंबई-पुणे रस्त्यावरील चर्च चौक (Church Chouk) भुयारी मार्ग परिसरात मेट्रोचे गर्डर (ढाचा) बसविण्याचे काम सुरू केले जाणार आहे. शनिवारपासून (२४ सप्टेंबर) या भागातील वाहतूक व्यवस्थेत २ नोव्हेंबरपर्यंत बदल असणार आहे. याप्रमाणे साई चौकातून चर्च चौकातील भुयारी मार्गाकडे येण्यास वाहनचालकांना मनाई करण्यात आली असून वाहनचालकांनी साई चौकातून उजवीकडे वळून रेंजहिल्स रस्ता, लष्करी रुग्णालय, सिंफनी सर्कल येथून डावीकडे वळून पोल्ट्री चौकातील भुयारी मार्ग किंवा सरळ रेंजहिल्स कॉर्नरकडे जावे (रस्त्याचा वापर करावा). रेंजहिल्स कॉर्नर परिसरातून वाहनचालकांनी शिवाजीनगर मार्गे इच्छित स्थळी जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शहराकडून औंधकडे येणारी तसेच मुळा रस्त्याने रेंजहिल्सकडे जाणार्‍या वाहनांना पोल्ट्री चौकातील भुयारी मार्गाकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पोल्ट्री चौकातून सरळ चर्च चौक, चर्च चौक भुयारी मार्ग, डावीकडे वळून केंद्रीय विद्यालय, उजवीकडे वळून साई चौक, आंबेडकर चौक किंवा चर्च चौकातील भुयारी मार्ग डावीकडे वळून केंद्रीय विद्यालय मार्गे सिंफनी सर्कल, रेंजहिल्स कॉर्नर, शिवाजीनगर मार्गे इच्छित स्थळी जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.