
टोळक्याने घातली महिला पोलिसांशी हुज्जत ; गुन्हा दाखल
पुणे लाईव्ह I ३० नोव्हेंबर २०२२ I नो पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी उचलण्याचा राग मनात धरून नऊ जणांच्या टोळक्याने शिवाजीनगर वाहतूक विभागात गोंधळ घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इतकेच नाही तर या नऊ जणांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत अश्लील वर्तन केल्याचेही उघड झाले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय सागर, प्रशांत पाटील, परीक्षित याल्लीर, विजय चौगुले, प्रज्वल सोनवणे, सचिन वाबळे, सतीश काळे, दत्तात्रय पटेरे आणि गणेश मोरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस नाईक सुशीला शामराव पवार यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
अधिक माहिती अशी, की विजय सागर याने नो पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी वाहतूक पोलिसांनी उचलून आणली होती. त्यावर 785 दंड लावण्यात आला होता. हाच राग मनात धरून वरील तरुणांनी शिवाजीनगर वाहतूक विभागात गोंधळ घातला. या ठिकाणी येऊन त्यांनी फेसबुक लाईव्ह केले. यातील काही आरोपींनी फिर्यादी यांना अश्लील भाषेत शिवीगाळही केली. प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
