
लोहगाव परिसरात गोळीबार करणारे चौघे अटकेत
पुणे लाईव्ह I २७ नोव्हेंबर २०२२ I दहशतीसाठी गोळीबार करणार्या चौघांना विमानतळ पोलिसांनी सहा तासाच्या आत लोहगाव परिसरातून अटक केली. नितीन किसन सकट (वय.21), गणेश सखाराम राखपसरे (वय.21), पवन युवराज पैठणकर (वय.18,राहणार सर्व राखपसरे वस्ती लोहगाव), अविनाश काळुराम मदगे (वय.22,रा.खेसे वस्ती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून गोळीबार करण्यासाठी वापरलेले पिस्तूल देखील जप्त करण्यात आले आहे.
कोरेगाव पार्कमध्ये दोन गटातील वादातून गोळीबाराची घटना ताजी असतानाच शुक्रवारी रात्री लोहगावात दोन ठिकाणी गोळीबार करुन दहशत पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. दारुच्या नशेत आपण भाई असल्याचे सांगत एका टोळक्याने हे कृत्य केले. याप्रकरणी, विमातळ पोलिसानी चौघांच्या विरुद्ध दहशत पसरवणे आणि आर्म ऍक्टनूसार गुन्हा दाखल केला. याबाबत पोलिस कर्मचारी प्रभाकर देवकाते (वय.32) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री दहा ते साडे दहा वाजताच्या सुमारास तुकाराम महाराज मंदीर चौक व गणपती चौक लोहगाव परिसरात घडली होती.
