
कोंढवा येथे गोळीबार ; तरुण जखमी
पुणे लाईव्ह I २७ नोव्हेंबर २०२२ I दुचाकीस्वार तरुणावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना कोंढवा परिसरातील बोपदेव घाटात घडली. दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने हा गोळीबार केल्याची माहिती आहे. आसिफ खान (वय 33, रा.कोंढवा खुर्द) असे गोळीबार झालेल्या तरुणाचे नाव आहे. खान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोंढवा पोलिसांनी दोघांविरुद्ध आर्म अॅक्टनुसार खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मध्यरात्री एक ते सव्वाएक वाजेच्या सुमारास घडली आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता, गोळीची रिकामी पुंगळी किंवा इतर काही मिळाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खान यांचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. खान आणि त्यांचे मित्र शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास बोपदेव घाटातून जेवण करून परत निघाले होते. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने खान यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. गोळीबारामागचे कारण समजू शकले नाही. जमीन खरेदी-विक्री व्यवहार किंवा वैमनस्यातून खान यांच्यावर गोळीबार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून सहायक पोलिस निरीक्षक अनिल सुरवसे तपास करत आहेत.
