PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

एका शब्दाने देशाचं राजकारण हललं; फडणवीसांचा ‘पंतप्रधान’ म्हणून उल्लेख कशाचा संकेत?

मुंबई | PuneLiveNews | देशाच्या राजकारणात 19 डिसेंबर या तारखेबाबत आधीच चर्चांना उधाण आलेले असताना, आता एका बड्या उद्योगपतीकडून झालेल्या विधानामुळे नव्या राजकीय तर्कवितर्कांना चालना मिळाली आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात उद्योगपती सज्जन जिंदाल यांनी भाषणादरम्यान देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख थेट “पंतप्रधान” असा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

कार्यक्रमात भाषण करत असताना सज्जन जिंदाल म्हणाले की, “पंतप्रधानांनी आपल्याला 500 मिलियन टन स्टील उत्पादनाचे लक्ष्य दिले आहे…” असे बोलताना त्यांनी चुकून देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान म्हणून संबोधले. काही क्षणातच चूक लक्षात येताच त्यांनी दिलगिरी व्यक्त करत तो उल्लेख मुख्यमंत्री म्हणून दुरुस्त केला.

मात्र, यानंतर जिंदाल यांनी केलेले विधान चर्चेचा विषय ठरले. “माझ्या तोंडून शब्द निघाला, पण कधीतरी ते पंतप्रधान होतील,” असे ते म्हणाले. याशिवाय भारतीय परंपरेत तोंडून निघालेल्या शब्दाला महत्त्व असते, असेही त्यांनी नमूद केले.

पृथ्वीराज चव्हाणांच्या भाकिताची पार्श्वभूमी

या घटनेला आणखी महत्त्व मिळते कारण काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी 19 डिसेंबरला देशात मोठा राजकीय भूकंप होईल आणि मराठी व्यक्ती पंतप्रधान होऊ शकते, असा दावा केला होता. त्यांनी ही व्यक्ती भाजपची असण्याची शक्यताही व्यक्त केली होती.

या विधानानंतर देशभरात आणि विशेषतः महाराष्ट्रात 19 डिसेंबरला काय घडते, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले होते.

योगायोग की संकेत?

दरम्यान, पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत आणि सज्जन जिंदाल यांच्या तोंडून फडणवीस यांचा पंतप्रधान म्हणून झालेला उल्लेख हा निव्वळ योगायोग आहे की भविष्यातील राजकीय घडामोडींचे संकेत आहेत, अशी चर्चा रंगली आहे.

नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपमधील संभाव्य नेतृत्वाबाबत जेव्हा चर्चा होते, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांचे नाव नेहमीच अग्रभागी घेतले जाते. संघाच्या पार्श्वभूमीतील नेतृत्व, महाराष्ट्रातील सलग निवडणूक यश आणि राष्ट्रीय पातळीवरील स्वीकारार्हता हे त्यांचे बलस्थान मानले जाते.

राजकीय चर्चांना उधाण

एकीकडे देशाच्या राजकारणात नेतृत्वबदलाच्या चर्चा सुरू असताना, दुसरीकडे अशा घटनांमुळे राजकीय वर्तुळातील कुजबुज आणखी तीव्र झाली आहे. येत्या काळात या चर्चांना वास्तवाचे रूप मिळते की त्या केवळ योगायोग ठरतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.