
प्रेयसीला ब्लॅकमेल करणाऱ्या प्रियकराविरुद्ध गुन्हा
पुणे लाईव्ह I २८ नोव्हेंबर २०२२ I प्रेयसीला ब्लॅकमेल करत फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून तब्बल 75 हजार रुपये उकळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. याप्रकरणी सुनिल कुमार मिना (वय 25, रा. बोपोडी) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 28 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे.
पिडीत तरुणी व सुनिलकुमार यांची 2021 मध्ये ओळख झाली होती. डिसेंबरपासून त्यांच्यात प्रेम संबंध निर्माण झाले. ते जून 2022 पर्यत सुरू होते. पण, त्याने तरुणीच्या मोबाईलमधून गुपचूप व्हिडीओ व फोटो असा डाटा काढून घेतला. त्याचा राग आल्याने तरुणीने त्याच्याशी असलेली रिलेशनशीप ठेवण्यास टाळाटाळ केली. त्यावेळी त्याने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. हे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची तसेच बदनामी करण्याची धमकी देऊन तिच्याकडून 75 हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले.
तर, त्याने तो लष्करात नोकरीस असल्याची बतावणी केली होती. त्याने बनावट ओळखपत्र देखील दाखविले होते. तरुणीचा पाठलाग करून त्याने भररस्त्यात तिला शिवीगाळ देखील केली. त्यानंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
