PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

कंपन्या देखील पडल्या एसटी मालवाहतुकीच्या प्रेमात

पुणे लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२२ । एसटी महामंडळाच्या घरसामान शिफ्ट करण्याच्या मालवाहतूक सुविधेकडे सामान्य नागरिक आकर्षित झाले आहेत. तसेच सिमेंटच्या क्षेत्रातील अग्रगन्य कंपन्यांकडूनही वाहतुकीचे टेंडरही ‘एसटी’ला मिळाले आहे. त्यामुळे खासगी कंपन्याही एसटीच्या मालवाहतूक सेवेच्या प्रेमात पडल्याचे दिसून येत आहे.

एसटीने उत्पन्न वाढीसाठी प्रवासी वाहतुकीसोबत मालवाहतूक सुरू केली. या मालवाहतुकीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. माल वाहतुकीसाठी तसेच घराचे सामान इतरत्र नेण्यासाठी नागरिक एसटी महामंडळाशी संपर्क साधत आहेत. आता यामध्ये एसटी महामंडळाने पुढचे पाऊल टाकले असून, खासगी कंपन्यांचे मालवाहतुकीचे टेंडर महामंडळ घेत आहे. त्यानुसार, वल्लभनगर आगारातील मालवाहतूक विभागाला सिमेंट कंपनीचे टेंडर मिळाले असून, या टेंडरप्रमाणे मालवाहतुकीचे काम मागील तीन महिन्यांपासून सुरू आहे.

एकीकडे खासगी मालवाहतूक कंपन्यांसमोर ‘एसटी’चा निभाव लागेल का, अशी भीती असली तरी, खासगी वाहतुकीपेक्षा एसटीची वाहतूक स्वस्त आणि सुरक्षित असल्याने खासगी कंपन्या या सेवेला प्राधान्य देत आहेत. परिणामी या स्पर्धेत एसटीची मालवाहतूक सेवा यशस्वी होत आहे.

पुस्तके, खाद्यान्न व बि-बियाणे इत्यादी सरकारी वाहतुकीच्या २५% वाहतूक एसटीने होत आहे. परंतु, आता खासगी कंपन्याही या सेवेकडे आकर्षित होत आहेत.