
१० कोटींचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी पतसंस्थेच्या चेअरमनला अटक
पुणे लाईव्ह I ३० नोव्हेंबर २०२२ I कोथरूड येथील लक्ष्मीबाई नागरी पतसंस्था याचे चेअरमन राजेंद्र बाबुराव पवार यांना त्यांच्या पदाचा गैरवापर करत सुमारे पावणे 10 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्या प्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक व सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे.
पवार यांनी त्यांच्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करत पतसंस्थेच्या अनामत खात्यातून वेळोवेळी बेकायदेशीररित्या रक्कम काढून त्यावरील व्याज भरले नाही. तसेच 20 ठेवीदरांच्या नावे बोगस कर्ज काढून ते स्वतः वापरले. याबरोबरच ठेविदारांना चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून त्यांच्या ठेवी घेतल्या व 31 मार्च 2022 ला मुदत संपूनही 6 हजार 302 ठेवीदरांच्या ठेवी व त्यावरील व्याज परत दिले नाही असा एकूण 9 कोटी 74 लाख 40 हजार 169 रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले आहे.
हा सारा प्रकार विशेष लेखापरिक्षक यजसिंग गायकवाड यांनी केलेल्या चाचणी लेखा परिक्षणातून समोर आले आहे.यावरून पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार, नियंत्रक अभिजीत भोसले, वैशाली पवार तसेच डायरेक्टर चंद्रशेखर देशमुख, संगाप्पा गोरे, दिलीप खुळे, प्रसाद माने, विजय साळवे, हेमांगी भोसले, प्रतिभा वाबळे यांच्याविरुद्ध ठेवीदारांची फसवणूक व आर्थिक व्यवहारात अपहार केल्याचा कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सध्या केवळ चेअरमन पवार यांना अटक झाली असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर करत आहेत.
