
राष्ट्रवादीसोबत आघाडी कोणालाही मान्य नव्हती – श्रीरंग बारणे
पुणे लाईव्ह I ७ डिसेंबर २०२२ I शिवसेनेने पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात संघर्ष केला. लोकसभा, विधानसभा निवडणूक भाजपसोबत युतीत लढतो. युती म्हणून लोकांनी एका भावनेने, विचाराने मतदान केले. पण, लोकांची भावना सोडून राष्ट्रवादीसोबत काम करावे लागले. पण, हे कोणालाही मान्य नव्हते, असे बाळासाहेबांची शिवसेनेचे उपनेते, खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. लोकांची भावना पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवली. परंतु, दखल घेतली नाही. त्यामुळे हा उद्रेक झाला. जनेतेची कामे करण्यासाठी ताकद मिळत नव्हती. पण, आपला कोणाविरोधात राग नाही, द्वेष नाही असेही ते म्हणाले.
बाळासाहेबांची शिवसेनेचा पदाधिकारी नियुक्ती मेळावा चिंचवड ऑटो क्लस्टर येथे आज (बुधवारी) पार पडला. उपनेते, कामगार नेते इरफान सय्यद, जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हाप्रमुख राजेश वाबळे, मावळचे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, शहरप्रमुख निलेश तरस, युवा सेना प्रमुख विश्वजीत बारणे, महिला संघटिका सरिता साने, युवती संघटिका शर्वरी गांवडे, माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे, विमल जगताप आदी उपस्थित होते.
पदाधिका-यांना मार्गदर्शन करताना खासदार बारणे म्हणाले, ”शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम केले. निवडणुका येतात-जातात. पण, सर्वसामान्यांची कामे करण्यासाठी पक्षप्रमुखांची ताकद नेत्यांना मिळाली पाहिजे. (Chinchwad News) पण, यापूर्वी ताकद मिळाली नाही. तरीही, आपला कोणाबाबत द्वेष, राग नाही. लोकसभेची निवडणुकीत शिवसेनेसोबत भाजपच्या कार्यकर्त्यांनीही तेवढेच काम केले होते. आता बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपची युती आहे. बाळासाहेबांची शिवसेना सकारात्मक काम करत आहे. बाळासाहेबांच्या विचारांचे पाईक म्हणून काम करत आहोत. पिंपरी, चिंचवड, मावळमधील 200 पदाधिकरी नियुक्त केले. 200 चे 2 हजार पदाधिकारी केले जाणार आहेत. त्यांच्या माध्यमातून ताकद उभी केली जाईल. जबाबदारी मिळालेल्या पदाधिका-यांनी जोमाने काम करावे. पदे घेतल्यानंतर जबाबदारीत फार मोठी वाढ झाली आहे. संघटन वाढवावे लागेल”.
