
पोलिसाला शिवीगाळ आणि घेतला चावा ; गुन्हा दाखल
पुणे लाईव्ह I २८ नोव्हेंबर २०२२ I आधी दुचाकीला धडक दिली, मुजोरीने निघून जाताना नागरिकांनी कार चालकाला पकडले. पोलीस घटनास्थळी पोहचली असता कारचालकाने थेट पोलिसांची कॉलर पकडली व हाताचा चावा घेतला. वाहतूक पोलिसांनी कारचालकाला पकडून निगडी पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.
हा प्रकार रविवारी (दि.27) ओटास्कीम येथील भाजी मंडई येथे घडला. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई देवबा मधुकर थोरात यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओटास्कीम येथील भाजी मंडई येथे स्वप्नील श्रीधर पवार (वय 38 रा. निगडी) हे त्यांच्या दुचाकीवरून (एम एच14 जे क्यू 2129) वरून जात असताना आरोपीने त्याच्या ताब्यातील कार (एम एच 12 जे सी 9180) वेगाने येत पवार यांच्या दुचाकीला धडक दिली.यावेळी न थांबता तो तसाच पुढे निघून जात होता. मात्र पवार यांनी तिथे असलेल्या नागरिकांच्या मदतीने आरोपीला पकडले व वाहतूक पोलिसांना घटनेची कल्पना दिली.
फिर्यादी तेथे आले त्यांनी आरोपीला चैकशी केली असता त्याने आरेरावी करत फिर्यादी यांची कॉलर पकडून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. फिर्यादी यांनी आरोपीला निगडी पोलीस ठाण्यात नेले असता त्याने आरडा-ओरडा करत पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके व पोलीस शिपाई विधाटे यांनाही शिवीगाळ केली. माझ्यावर तुम्ही कशी कारवाई करता हेच पाहतो, म्हणत पोलिसांशी झटापट केली व पोलीस शिपाई विधाटे यांच्या हाताचा चावा घेतला. यावरून निगडी पोलीस ठाण्यात गुन्ह दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
