
कोंढव्यातील अनधिकृत बांधकामांवर गुन्हे दाखल
पुणे लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२२ । कोंढवा हा शहरातील सर्वात वेगाने विस्तारणारा भाग आहे आणि त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत. महापालिकेच्या बांधकाम नियमांची पायमल्ली करून दोन-तीन मजली इमारती बांधल्या जाऊ लागल्या. बिल्डरच्या धाकापुढे काही स्थानिक नगरसेवकांनी शरणागती पत्करली, तर पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी या प्रकरणाचा ताबा घेत पोलिसांना बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
पुणे महापालिकेचे कनिष्ठ अभियंता निशिकांत चाप्पेकर यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात अनधिकृत बांधकामाबाबत गुन्हा दाखल केला आहे. सर्वे क्रमांक ४६ भाग मिठानगर, कोंढवा येथील अनधिकृत बांधकामाबाबत आरोपी बिल्डर बिलाल पटेल याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ४३ व ५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआर क्र. ८६१/२२ दाखल केला आहे.
कोंढव्यातील अनधिकृत बांधकामांचा विस्तार पाहता बांधकाम विकास विभागातील निरीक्षक आणि कनिष्ठ अभियंत्यांचा ‘अर्थपूर्ण’ आंधळेपणा याला कारणीभूत ठरत आहे. बिल्डर बिलाल पटेल यांच्या इमारतीवर कारवाई सुरू असतानाच पुन्हा कोणतीही अडवणूक न करता इमारत पूर्ण करण्याचा आराखडा तयार करण्यात आला. सदर बेकायदा अनधिकृत बांधकामात सदनिका घेतल्यास भविष्यात नागरिकांची मोठी फसवणूक होऊ शकते.
याबाबत लवकरच मोठी कारवाई होणार असल्याचे संकेत उपअभियंता दुडूस्कर यांनी दिले आहेत.