
ATM मध्ये मदतीच्या बहाण्याने ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला घातला गंडा
पुणे लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२२ । एटीएममधून रोकड काढण्यासाठी गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला मदत करण्याचे खोटे नाटक करून चोरट्याने बँक खात्यातून पावणेसहा लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना सामोरे आली आहे. चोरट्याने मदत करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठाचे डेबिट कार्ड चोरून बँक खात्यातून वेळोवेळी रोकड चोरल्याचे समोर आले आहे. याबाबत शनिवार पेठेतील एका ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी ज्येष्ठ नागरिक शनिवार पेठेत राहायला आहेत. ११ ऑक्टोबर २०२२ रोजी ते बाजीराव रस्त्यावरील एका बँकेच्या एटीएम मध्ये रोकड काढण्यासाठी गेले होते. त्या वेळी चोरटा एटीएम सेंटरच्या परिसरात थांबला होता. ज्येष्ठ नागरिक एटीएममधून पैसे काढत होते, त्या वेळी चोरटा एटीएम सेंटरमध्ये आला व त्याने मदत करण्याचे ढोंग केले. चोरट्याने हातचलाखीने ज्येष्ठ नागरिकाचे डेबिट कार्ड चोरले. त्याऐवजी त्यांना दुसरे डेबिट कार्ड दिले.
चोरट्याने मदतीच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाकडून एटीएमचा गोपनीय क्रमांक (पिन) घेतला होता. ज्येष्ठ नागरिकाचे चोरलेले डेबिट कार्ड आणि पिनचा गैरवापर करून चोरट्याने गेल्या दहा ते बारा दिवसांत वेळोवेळी बँक खात्यातून पाच लाख ७९ हजार रुपये लांबवले. बँक खात्यातून पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक वर्षाराणी सुतार तपास करत आहेत.