
वाईन शॉपवर दरोडा टाकण्याच्या उद्देशात असणाऱ्या ९ जणांना अटक
पुणे लाईव्ह I २८ नोव्हेंबर २०२२ I पिंपरीगाव येथील वाईन शॉपवर सशस्त्र दरोडा घालण्याच्या तयारी असणाऱ्या नऊ आरोपींना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पोलिसांनी शनिवारी (दि.26) पिंपरीगाव येथील नवमहाराष्ट्र शाळेजवळ करण्यात आली.
यश कैलास भोसले (वय 19 रा. पिंपरी), आकाश विनोद हराळे (वय 26 रा.पिंपरी), निहाल मोहम्मद शेख (वय 25 रा.चिंचवड), अजय लोभाजी कांबळे (वय 20 रा. चिंचवड),महेश महादेव चंदनशिवे (वय 26 रा.चिखली), अनिकेत सचिन पवार (वय 21 रा.खडकी), अविनाश राकेश पवार (वय 23 रा.चिंचवड), शुभम दिपक घरवाढवे (वय 19 रा. पिंपरी), बालाजी रमेश ओगले (वय 25 रा.पिंपरी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध महादेव सावर्डे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना मिळालेल्या बातमीनुसार पोलिसांनी आरोपींना पिंपरी गाव येथून ताब्यात घेतले. ते पिंपरी येथील रिगल वाईन शॉप येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे आरोपींनी सांगितले. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून 50 हजाररुपयांची देशी बनावटीची पिस्टल, 4 हजार रुपयांची 4 जिवंत काडतुसे, 500 रुपयांची एक छऱ्याची बंदूक, 90 हजार रुपयांचे सात मोबाईल फोन, दोन मिरची पावडरच्या पुड्या, 1 लाख 20 हजार रुपयांच्या 4 दुचाकी असा एकूण 2 लाख 64 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक डोंव हे पुढील तपास करत आहेत.
