
हवेत गोळीबार करणाऱ्या तिघांना 4 तासात अटक
पुणे लाईव्ह I ७ डिसेंबर २०२२ I पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवार, 6 डिसेंबर 2022 रोजी तीन ठिकाणी हवेत गोळीबार करणाऱ्या तीन आरोपींना (Pimpri news) अवघ्या 4 तासात अटक करण्यात आले आहे. अशी माहिती पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
मंगळवार, 6 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी पत्रा शेड झोपडपट्टी, रेल्वे लाईन जवळ, लिंक रोड चिंचवड येथे एका रिक्षा मधून आलेल्या तीन इसमांनी हवेत फायरिंग केल्याबाबत गुन्हे नियंत्रण कक्ष येथून माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने वरिष्ठांनी गुन्हे शाखेच्या सर्व पथकांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याबाबत आदेश देण्यात आले. त्याप्रमाणे दरोडाकृती पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे व आमलदार या सर्वांनी घटनास्थळी भेट देऊन सविस्तर माहिती घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक नवले यांनी पथकास गुन्ह्याच्या अनुषंगाने कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. अधिक माहिती घेतली असता सदर गुन्ह्यात शाहरुख शेख आरोपी असल्याचे कळाले.
आरोपी शाहरुख शेख दापोडी येथे राहत असल्याने त्या परिसरात त्याचा शोध घेत असताना पोलीस शिपाई गणेश सावंत, विनोद वीर व सुमीत देवकर यांना मिळालेल्या बातमीच्या आधारे त्याला सापळा रचून शिताफीने ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडे या गुन्ह्याच्या बाबत अधिक चौकशी केला असता त्याने हा गुन्हा त्याचे साथीदार शोएब अलवी, सागर मलिक उर्फ मायकल व फारुख शेख यांच्यासह मिळून केल्याची कबुली दिली. आरोपी शाहरुख शेख याच्या मदतीने त्याची इतर पाहिजे दोन आरोपीचा शोध घेत असताना आरोपी मोहम्मद अलवी याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. तसेच फारुख शेख याला गुंडा विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे.
