PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

इलेक्ट्रॉनिक मोटारपंप चोरणाऱ्या तिघांना अटक

पुणे लाईव्ह I १९ डिसेंबर २०२२ I इंद्रायणी नदी पात्रातून शेतकऱ्यांचे इलेक्ट्रॉनिक मोटारपंप चोरणाऱ्या तिघांना आळंदी पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केले आहे. त्यांच्याकडून दोन गुन्हे उघड झाले असून एकूण 2 लाख 10 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सर्व पोलीस ठाण्यात घरफोडी, चोरी यासारख्या गुन्ह्यांचा तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना व आदेश दिलेले आहेत.

त्या अनुषंगाने आळंदी पोलीस ठाण्यातील गुन्हे तपास पथकातील पोलीस आर. एम. लोणकर, बी. व्ही. खेडकर, के. सी. गर्जे हे चऱ्होली खुर्द परिसरात पेट्रोलींग करत असताना सावली हॉटेल समोरून दोन इसम त्यांच्या ताब्यातील स्कुटी, मोटार सायकल क्रमांक एम.एच. 14. एच. झेड. 1927 या गाडीवर पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये काहीतरी संशयीत वस्तू लपवून घेऊन चऱ्होली बुद्रुक बाजूकडे जात असताना या गुन्हे तपास पथकातील पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून इंद्रायणी नदीवरील पुलाचे अलीकडे अडवून त्यांना त्यांचा नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव निखील अरूण पगडे (वय 21 वर्षे, धंदा शेती, रा. चऱ्होली खुर्द, ता. खेड, जि. पुणे), अफजल इस्लाम खान (वय 21 वर्षे, धंदा भंगार विकी, सध्या रा. चऱ्होली बुद्रुक, ता. हवेली, जि. पुणे, मुळ रा. बेगमवाड, प्रतापगड, ता. जि. प्रतापगड, राज्य उत्तरप्रदेश) असे सांगितले. त्यावेळी त्यांच्याकडील गोणीमध्ये (Charholi) लपविलेल्या वस्तूची पाहणी केली असता, त्यामध्ये एक इलेक्ट्रीक मोटार पंप सापडले.

सदर मोटार पंपाबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता, ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यामुळे त्यांना अधिक चौकशीसाठी ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याकडे सखोली चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, आम्ही दोघांनी मिळून दहा दिवसांपूर्वी मौजे चऱ्होली खुर्द (ता.खेड) हद्दीतील इंद्रायणी नदी पात्रातून काही मोटार पंप चोरी केले आहेत. त्यामधील काही मोटार पंप त्यांच्या ओळखीचा भंगार दुकानदार सहरोज उर्फ आसिफ अकील खान (वय 23 वर्षे, रा. च-होली बुद्रुक, ता. हवेली, जि. पुणे) यास विकल्याचे त्यांनी सांगितले. यावरून पोलिसांनी या दोन आरोपी तसेच भंगार व्यावसायिक आसिफ अकील खानकडून सहा इलेक्ट्रीक मोटार पंप व गुन्ह्यात वापरलेली एक मोटार सायकल जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी दिली.