
मोफत साडी वाटपच्या बहाण्याने महिलेची केली फसवणूक
पुणे लाईव्ह I ९ डिसेंबर २०२२ I महिलांना मोफत साडी वाटप करण्यात येत असल्याची बतावणीकरून चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेचे पावणे तीन लाख रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केल्याची घटना घडली. कसबा पेठेतील लाल महाल चौक परिसरात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी 75 वर्षीय ज्येष्ठ महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारदार महिला बुधवार चौकात राहायला आहेत. त्या लाल महाल चौकातील श्री दत्त मंदिरात दुपारी तीनच्या सुमारास दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यावेळी दोन चोरट्यांनी त्यांना ‘आमच्या शेठला मुलगा झाला असून ज्येष्ठ महिलांना साडी वाटप करत आहेत’, अशी बतावणी केली. त्यानंतर चोरट्यांनी महिलेला दागिने पिशवीत काढून ठेवण्यास सांगितले. त्यांना बोलण्यात गुंतवून चोरट्यांनी पिशवीतील दागिने चोरून नेले. काही वेळानंतर महिलेच्या लक्षात आला. पुढील तपास पोलीस करत आहेत.
