
घर न दिल्याने लग्न मोडले
पुणे लाईव्ह I ६ डिसेंबर २०२२ I बैठकीत मंजूर झाल्या प्रमाणे देणे- घेणे करत साखरपुडा पार पाडला,मात्र पुढे हुंड्यात घराची मागणी करत ठरलेले लग्न मोडले.याप्रकरणी वर पक्षावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नोव्हेंबर 2022 ते आज अखेरपर्यंत थेरगाव येथे घडली आहे.
याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून उमेश सुरेश गोगेकर (वय 26), महिला आरोपी,महेश सुरेश गोगेकर(वय 28),सतिष सुरेश गोगेकर (वय24) सर्व राहणार इचलकरंजी, कोल्हापूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीचे मेश याच्याशी लग्न जमले होते. या लग्नाचे बैठकीत महिला आरोपीने तब्बल 25 तोळे सोने व 2 लाख रुपये हुंडा अशी मागणी केली. यावेळी एवढे शक्य नाही आम्ही आमच्या मुलीला योग्य ते देऊ असे बोलल्यानंतर तडजोडी अंती 4 तोळे सोने वरास व सात तोळे सोने वधूला, 51 हजार रुपये हुंडा असे ठरले. तसेच साखरपुड्यासाठी वधु पक्षाला 4 लाख 56 हजार 800 रुपयांचा खर्च कऱण्यास भाग पाडले. तसेच पुढे आरोपींनी हुंडा म्हणून इचलकरंजी येथे घराची मागणी केली ते दिले नाही म्हणून ठरलेले लग्न मोडत फिर्यादी व त्यांच्या मुलीची फसवणूक केली. यावरून आरोपीवर फसवणूक, हुंडा मागणे तसेच अब्रुनुकसानीचा गुन्हा वाकड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.