PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

हवेली तालुक्याच्या तहसीलदार निलंबित

पुणे लाईव्ह I १० डिसेंबर २०२२ I निर्णय देताना अनियमितता व हडपसर येथील जमिनीच्या प्रकरणात दिलेले चुकीचे आदेश यावरून तृप्ती कोलते यांना त्यांच्या पदावरून निलंबीत करण्यात आले आहे. यासंबंधी राज्य शासनाच्या वतीने शुक्रवारी (दि.9) रात्री काढण्यात आले.

आदेशात म्हटले आहे, की हडपसर येथील जमिनीच्या प्रकरणात कोलते यांच्याकडून चुकीचे आदेश करण्यात आले आहेत. याशिवाय कोविड काळात औषध खरेदीतील अनियमितता आणि निवडणूक विषयक गंभीर स्वरूपाच्या तक्रारी कोलते यांच्याविरोधात होत्या. त्याआधारे कोलते यांना निलंबित करण्यात आल्याचे निलंबनाच्या आदेशात म्हटले आहे.

हडपसर येथील जमीन प्रकरणात तत्कालीन महसूल मंत्री तसेच जिल्हाधिकारी आणि वरिष्ठांचे आदेश लक्षात न घेता निर्णय देताना अनियमितता करण्यात आल्याचा प्रमुख आरोप कोलते यांच्यावर ठेवण्यात आला आहे. कोविड काळात करण्यात आलेली औषध आणि आवश्यक साहित्य खरेदी प्रकरणात शासनाने घालून दिलेली विहित नियमावली न पाळता त्यात अनियमितता झाल्याचा आरोप निलंबनाच्या पत्रात करण्यात आला आहे. निवडणूक विषयक गंभीर स्वरूपाच्या तक्रारी असल्याचेही निलंबन आदेशात म्हटले आहे.

तृप्ती कोलते गेल्या दोन वर्षापासून हवेली तहसीलदार म्हणून काम पाहत आहेत. संपूर्ण पुणे शहर आणि शहरालगतच्या ग्रामीण भागाचा हवेली तालुक्यात समावेश आहे.