
वारजे येथे स्कूल वॅनला आग
पुणे लाईव्ह I २३ डिसेंबर २०२२ I वारजे येथे रोडवर स्कूल वॅनला आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही, अशी माहिती सचिन मांडवकर (केंद्र प्रमुख, वारजे अग्निशमन केंद्र) यांनी दिली आहे.
आज सकाळी सव्वा आठच्या दरम्यान एका स्कुल वॅनला वारजेमधील हॉटेल कावेरीसमोर आग लागली होती. एका नागरिकाने पाहिले आणि त्याने लगेच जाऊन जवळच असलेल्या वारजे अग्निशमन केंद्राला माहिती दिली. त्यामुळे लगेच 2 मिनिटात अग्निशमन बंब तेथे पोहोचला.
काही नागरिकांनी हॉटेलमधून पाणी घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण, आग विझली नाही. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी जोरदार पाण्याचा मारा केल्याने 2 मिनिटात आग विझली.
स्कुल वॅन चालक विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत सोडून परत जात असताना ही आग लागली होती. त्यामुळे वॅनमध्ये विद्यार्थी नव्हते. तसेच, चालक वॅन बाहेर लगेच आल्यामुळे तोही सुखरूप आहे.
