
लोणावळा येथील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
पुणे लाईव्ह ।३१ डिसेंबर २०२२ । सहाय्यक पोलीस अधीक्षक IPS सत्यसाई कार्तिक यांनी अवैध व्यावसाय करणार्यांवर धडक कारवाई मोहिम सुरु केली आहे. सुरुवातीच्या काळात अवैध दारुधंद्यावर कारवाई मोहिमा केल्यानंतर काल ग्रामीण भागातील मटक्याच्या व्यावसायावर व आज लोणावळ्यातील एका हाॅटेलमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यावसायावर धडक कारवाई करत वेश्या व्यावसायाचा पर्दाफाश केला आहे.
लोणावळा शहरात राष्ट्रीय महामार्गालगत एका हाॅटेलमध्ये महिलांकडून वेश्या व्यावसाय करुन घेतला जात असल्याची माहिती लोणावळा उप विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना मिळाल्यानंतर आज सायंकाळी 5.15 वाजण्याच्या सुमारास याठिकाणी लोणावळा उप विभागातील पोलिसांच्या पथकाने छापा मारत सदरची कारवाई केली.
हाॅटेल मालक सतीश एच. शेट्टी (वय 59, रा. सुदर्शन हाॅटेल, मुंबई पुणे रोड लोणावळा) व त्याची महिला साथीदार यांच्यावर याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि.नं.244/2022 अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम 1956 चे कलम 3, 4, 5 भा. द. वि. कलम 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पिडित दोन महिलांना सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. लोणावळा उप विभागातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मारुती गोफणे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सुदर्शन लॉजमध्ये वेश्या व्यवसायाकरीता महिला बोलावून घेवून त्यांचे करवी वेश्यागमनाचा मोबदला स्वीकारुन वेश्या व्यवसाय करुन घेत होते.
लोणावळा उप विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक यांना याबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्याच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक कारंडे, सहाय्यक फौजदार मारुती गोफणे, आण्णा बनसोडे, महिला पोलीस हवालदार मसळे, पोलीस काॅन्स्टेबल शिंदे, चालक दत्ता शिंदे यांच्या पथकाने सदरची कारवाई केली.