
पिंपरी : शहरात पाच अनधिकृत शाळा
महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून शहरातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर झाली असून, शहरात 5 अनधिकृत शाळा आढळल्या आहेत. महापालिकेकडून वारंवार सूचना करूनही अद्याप काही शाळांनी मान्यता मागविण्यात टाळाटाळ केल्यामुळे या शाळांना अनधिकृत ठरविण्यात आले आहे. शिक्षण विभागाकडून अनधिकृत शाळांचे सर्वेक्षण केल्यानंतर 5 अनधिकृत शाळा आढळल्या आहेत. शासनाची कोणतीही परवानगी न घेता या शाळा अनधिकृरित्या चालविण्यात येत होत्या. या अनधिकृत शाळा बंद करण्यासाठी त्या संबंधित शाळेच्या संस्थांना दरवर्षी नोटीसही बजावल्या जात आहे; मात्र या नोटिशींकडे दुर्लक्ष करत या शाळा बिनदिक्कतपणे सुरू आहेत.
संबंधित शाळांना नोटीस बजावून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश पर्यवेक्षकांना दिलेले आहेत. शहरात एकूण 11 अनधिकृत शाळा होत्या. यावर्षी 6 शाळा बंद करण्यात आल्या आहेत, तर 8 शाळांकडून 20 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
या आहेत अनधिकृत शाळा
ज्ञानराज प्राथमिक शाळा कासारवाडी, मॉडर्न पब्लिक स्कूल रहाटणी, माने इंग्लिश स्कूल, राजवाडेनगर काळेवाडी, काकाज इंटरनॅशनल स्कूल काळेवाडी, होली मिशन इंग्लिश मीडियम स्कूल नवी सांगवी.
शहरातील या अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊ नये. या शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास होणार्या नुकसानीस ते स्वत: जबाबदार राहतील. तसेच संबंधित शाळांनी शासनाची परवानगी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. परवानगीशिवाय शाळा सुरू केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
– संजय नाईकडे प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग पिं.चिं