PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

पिंपरी चिंचवड महापालिका चिखलीऐवजी मोशीत रुग्णालय बांधणार, 850 बेडच्या इमारतीसाठी 450 कोटी खर्च

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथे 850 बेडचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय बांधण्यात येणार होते. मात्र, चिखलीऐवजी मोशीतील गायरान जागेवर रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी 215 कोटींऐवजी 450 कोटी इतक्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवारी (दि.10) सर्वसाधारण सभेची प्रशासकीय मान्यता दिली.

शहरातील आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी चिखली येथील गट क्रमांक 1653 येथील आरक्षण क्रमांक 1/88 या भूखंडावर हे रुग्णालय बांधण्यात येणार होते. त्याला सर्वसाधारण सभेने 20 जानेवारी 2021 ला मंजुरी दिली होती. त्यानुसार, पालिकेच्या स्थापत्य बीआरटीएस- विभागामार्फत सन 2021-22 च्या अर्थसंकल्पात प्रभाग क्रमांक 1 चिखली येथील गट क्रमांक 1653 व 1654 (गायरान) मधील आरक्षणावर 850 बेडचे रुग्णालय विकसित करण्यासाठी 215 कोटी मूळ प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. रुग्णालयासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली होती. मात्र, ती जागा वनक्षेत्रात असल्याने तो भूखंड देण्यास जिल्हाधिकार्‍यांनी नकार दिला आहे. ती जागा रद्द करून मोशी येथील गट क्रमांक 646 मधील गायरान जागेचा पर्याय समोर ठेवण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ताब्यात आलेल्या 6 हेक्टर जागेत रुग्णालय उभारण्याचे नियोजन केले आहे. खर्चासाठी 215 कोटी रक्कम कमी पडत असल्याने ती वाढवून 450 कोटी करण्यात आली आहे. त्या निधीस सर्वसाधारण सभेची प्रशासकीय मान्यता आयुक्त सिंह यांनी दिली. रुग्णालयाच्या कामासाठी कोटेशन प्रक्रिया राबवून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार व आर्किटेक्ट म्हणून बेरी बिल्टस्पेस डिझाईन प्रा. लि. यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी सर्वेक्षण करून कामांचे अंदाजपत्रक तयार केले. त्याप्रमाणे आयुक्तांच्या मान्यतेने हा बदल करण्यात आला.