
हॉटेल मालक आणि वेटरचा एकावर जीवघेणा हल्ला
पुणे लाईव्ह I १२ डिसेंबर २०२२ I पुण्यातील कात्रज परिसरात असणाऱ्या एका हॉटेलमध्ये जोर जोरात गप्पा मारणाऱ्या ग्राहकावर हॉटेल मालक आणि वेटरने जीवघेणा हल्ला केला. मांगडेवाडी परिसरात असणाऱ्या मल्हार रेस्टॉरंट मध्ये ही घटना घडली. कांदा कापण्याच्या चाकूने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.
याप्रकरणी निशांत धनंजय जाधव (वय 25, रा. दौलतनगर, धनकवडी) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी हॉटेल मालक मनोहर रघुनाथ मांगडे (वय 44, रा. मांगडेवाडी), वेटर ऋषिकेश जयसिंग देशमुख (वय 30, रा. मांगडेवाडी, कात्रज) यांना अटक केली आहे. तर, अक्षय आणि अजित निंबाळकर यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार व त्यांचे मित्र प्रसाद मारणे, राकेश हुंबरे, मयुर धुमाळ व इतर तिघे असे सर्व जण मल्हार फॅमिली रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यांच्यात चेष्टा मस्करी सुरु होती. त्यामुळे हॉटेलच्या वेटरने त्यांना आरडाओरडा करू नये असे सांगितले. तरीही ते मोठ मोठ्याने गप्पा मारत होते. तेव्हा रेस्टॉरंटचे मालक मनोहर मांगडे हे तेथे आले व त्यांनी आवाज कमी करण्याबाबत सांगितले होते, असे सांगत असताना त्यांच्यात व प्रसाद मारणे, राकेश हुंबरे यांच्याशी वाद झाला. त्यानंतर मांगडे याने कांदा कापण्याचा चाकूने वार केले.
एक वार चुकविल्यानंतर दुसरा वार त्यांच्या उजव्या बरगडीवर बसला. तर, प्रसाद मारणे याच्या कंबरेवर चाकूने मारुन त्याला ही गंभीर जखमी केले. हॉटेलमधील वेटर देशमुख, अक्षय यांनी प्रसाद मारणे याला लाकडी दांडक्याने मारुन गंभीर जखमी केले. तसेच राकेश हुंबरे व मयुर धुमाळ यांना लाकडी दांडक्याने डोक्यात मारुन जखमी केले. रेस्टॉरंटमध्ये फॉर्च्युनर गाडीतून आलेल्या अजित निंबाळकरने सनी सत्यार्थी याला लाकडी दांडक्याने मारुन गंभीर जखमी केले. अधिक तपास पोलीस करत आहेत.
