
पिसोळी येथे हार्डवेअर दुकानाला आग
पुणे लाईव्ह । १ जानेवारी २०२३ । पिसोळी येथील पेट्रोल पंपाजवळील हार्डवेअर दुकानास पहाटेच्या सुमारास आग लागली. अग्निशमन विभागाकडून तत्काळ पाण्याचा मारा करून आग विझवण्यात आली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या कोंढवा अग्निशमन केंद्राचे फायरमॅन तेजस खरीवले म्हणाले की, आज पहाटे पिसोळी येथील पेट्रोल पंपजवळील हार्डवेअर दुकानास आग लागल्याची वर्दी मिळाली. त्यामुळे एक अग्निशमन बंब व टँकर पहाटे 4.30 वा घटनास्थळी पाचारण करण्यात आला . तीन मजली इमारतीतील तळ मजल्यावरील दुकानास ही आग लागली होती.
दुकान बंद असल्याने बार्स व कटावणी ने दरवाजा उघडण्यात आला. या दुकानात असलेले सोफा बनवण्याचे साहित्य, केमिकलचे डब्बे, पुट्ठे यांना आग लागली होती. काही सामान तातडीने हलवण्यात आले. अग्निशमन विभागाने पाण्याचा मारा करून सकाळी 6.30 वा सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत काही प्रमाणात दुकानातील साहित्य जळून खाक झाले. मात्र दुकान बंद असल्याने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.