
अग्निशमन दलाच्या जवानांना नववर्षानिमित्त पुस्तके भेट
पुणे लाईव्ह । १ जानेवारी २०२३ ।नवीन वर्ष 2023 च्या आगमनाला शुभेच्छा म्हणून पुणे अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी एक नवीन उपक्रम हाती घेत जवानांना विविध प्रकारची पुस्तके भेट म्हणून दिली.
वाचनाची गोडी निर्माण व्हावी तसेच वाचनाने विचार वृध्दिंगत होत ज्ञानात भर पडावी या हेतूने त्यांनी आज नववर्षानिमित्त एक उपक्रम राबवीत अग्निशमन दलाच्या मुख्यालयासह एकूण वीस अग्निशमन केंद्रातील जवानांना विविध प्रकारची वाचनाची पुस्तके भेट म्हणून दिली.
पीएमआरडीए अग्निशमन दलातही त्यांनी हा उपक्रम राबवीत तेथील जवानांना ही वाचनासाठी पुस्तके दिली आहेत. आजच्या डिजिटल क्रांतीच्या युगात आपल्या जवानांनी प्रत्यक्ष पुस्तक वाचन करत पुढे जावे, असा त्यांनी विचार केला.
अग्निशमन दलातील सर्व केंद्रामधे ही पुस्तके पोहोचताच जवानांनी पोटफोडे यांचे प्रत्यक्ष फोन करत व सोशल मिडियावर प्रतिक्रिया देत नवीन उपक्रम राबविल्याबद्दल त्यांचे आभार मानत आनंद व्यक्त केला.
“वाचन करणे ही एक चांगली सवय आहे. आपल्याला वाचन करण्याची आवड असेन तर आपला अमूल्य वेळ वाया न जाता तो वाचनात जातो आणि त्यातून आपण अनेक सुंदर विचार शिकून घेतो.ज्ञान आणि वाचन यांचे नाते अगदी जवळचे आहे . ज्ञान पाहिजे असेल तर वाचन करावेच लागेल आणि वाचन असेल तर ज्ञान प्राप्त होतेच.. माझ्या सहकाऱ्यांनी एक चांगला माणूस आणि सुजाण नागरिक व्हावं याच उद्देशाने हा छोटासा प्रयत्न”,असे मत देवेंद्र पोटफोडे यांनी व्यक्त केले.