
पुण्यात एनआरडीसीच्या लोकसंपर्क केंद्राची स्थापना
पुणे लाईव्ह I २१ डिसेंबर २०२२ I केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अख्त्यारातील राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळ (एनआरडीसी)चे लोकसंपर्क केंद्र (आउटरिच सेंटर) आघारकर संशोधन संस्थेची स्थापन करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून एकस्व अधिकार, स्वामित्व हक्क,व्यापारचिन्ह दाखल करणे, नवउद्यमी, उत्पादन, उत्पादन संरक्षण, तंत्रज्ञान हस्तांतरण इत्यादी कामे केली जाणार आहेत. अशी माहिती एनआरडीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अमित रस्तोगी यांनी दिली.
आघारकर संशोधन संस्थेशी केलेल्या सामंजस्य करारा अंतर्गत लोकसंपर्क केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. दिल्ली येथे मुख्य कार्यालय असून दुसरे कार्यालय विशाखापट्टनम येथे आहे. पश्चिम भारतासाठी पुण्यात केंद्र सुरु करण्यात आले आहे. ईशान्य भारतासाठी गुवाहाटी मध्ये केंद्र स्थापन करण्याचे नियोजन आहे.
रस्तोगी म्हणाले की, विविध राष्ट्रीय संशोधन व विकास संस्था, विद्यापीठे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमधून निर्माण होणाऱ्या तंत्रज्ञानाचा विकास, प्रचार व हस्तांतरण करण्याचे कार्य एनआरडीसी करते. रसायने, कृषी आणि अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान, जैवविज्ञान, यांत्रिकी, विद्युत आदी क्षेत्रातील विक्रीयोग्य औद्योगिक उत्पादने आणि सेवांमध्ये संशोधनासाठी प्रोत्साहन दिले जाते. गेल्या पाच वर्षांत दोन हजार तंत्रज्ञान हस्तांतरण करण्यात आले. त्यामुळे सुमारे 4500 कोटी रुपयांची भर देशाच्या अर्थव्यवस्थेत पडली आहे. करोना काळात व्यवसायावर परिणाम झाल्यानंतर उद्योगांचा प्रतिसाद वाढला आहे.
शैक्षणिक संस्था, उद्योगांचे पुणे हे महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे पुण्यातील लोकसंपर्क केंद्राद्वारे नवउद्योजकांना, संशोधकांना, उद्योगांना, शैक्षणिक संस्थांना फायदेशीर ठरेल.आघारकर संशोधन संस्थेत लोकसंपर्क केंद्रासह इन्क्युबेशन सेंटरही सुरू केले जाणार असल्याचे मुंदडा यांनी नमूद केले.