
कोयत्याने दुसऱ्याचे मुंडके कापून धड रोटाव्हेटरमध्ये फिरवून केला स्वतःच्या मृत्यूचा बनाव
आरोपीला दशक्रिया विधीनंतर अटक ; चऱ्होली येथील खळबळजनक घटना
पुणे लाईव्ह I २७ डिसेंबर २०२२ I एका नराधमाने दुसऱ्या व्यक्तीचे शीर धडा वेगळे करत स्वतःच्या खुनाचा बनाव करण्यासाठी स्वतःचे कपडे घालून मृतदेह पुन्हा रोटर मशीनमध्ये फिरवून निर्घृण खून केला आहे. हा प्रकार चऱ्होली खुर्द येथे 16 डिसेंबरला रात्री घडला. आरोपीचा हा बनाव हा काही प्रमाणात यशस्वी देखील झाला. आरोपीचे अपघाती निधन झाल्याचे मानून कुटुंबीयांनी दुसऱ्याच व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यविधी करून त्यांचा दशक्रिया विधी देखील करण्यात आला, मात्र आरोपी पोलिसांच्या हाती लागल्याने कुटुंबीयांना चांगलाच धक्का बसला आहे.
स्वतःच्या खूनाचा बनाव करण्यासाठी आरोपीने दुसऱ्या व्यक्तीचे शीर धडा वेगळे केले, स्वतःचे कपडे मृतदेहाला घालून मृतदेह पुन्हा शेतातील रोटर मशीनमध्ये फिरवून निर्घृण खून केला आहे. हा प्रकार चऱ्होली खूर्द येथे 16 डिसेंबर रोजी रात्री सव्वा अकरा वाजता घडला.
सुभाष उर्फ केरबा छबन थोरवे (वय 65 रा.चऱ्होली) असे अटक आरोपीचे नाव आहे. तर रविंद्र भिमाजी घेनंद (वय 48) असे मयत व्यक्तीचे नाव असून निखील रविंद्र घेनंद (वय 28 रा. धानोरे, खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी याचे एक महिले सोबत प्रेमसंबंध होते. त्याला त्याच्या प्रेयसीसोबत दूर कोठे तरी जाऊन रहायचे होते. यासाठी त्याला त्याच्याच मृत्यूचा बनाव बनवायचा होता. यासाठी त्याने महिले सोबत मिळून रविंद्र घेनंद यांना विश्वासात घेऊन सुभाष ज्ञानोबा थोरवे यांच्या शेतात बोलावले. कोयत्याने त्यांचे मुंडके कापले, मृतदेहाच्या अंगावर स्वतःचे कपडे घातले. तसेच शेतात काम करावयाच्या रोटर मशीनमध्ये मृतदेह घालून तो फिरवला व हा अपघात असल्याचा बनाव केला. तसेच मृतदेहाचे मुंडके, कोयता, व अंगावरचे कपडे लपवून ठेवत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
आरोपीचा बनाव हा एखाद्या चित्रपटाला शोभेल असाच होता. त्यात तो काही प्रमाणात यशस्वी देखील झाला. थोरवे कुटुंबीयांनी मृतदेह शेतात पाहिला तेव्हा त्याला मुंडके नव्हते पण अंगावर सुभाष उर्फ केरबा याचे कपडे होते. त्यामुळे त्यांना केरबा यांचेच अपघाती निधन झाल्याचे त्यांनी मान्य केले. यावरून अंत्यविधी करून त्यांचे दहावे देखील घरच्यांनी घातले. मात्र, आरोपी दुसऱ्या गावात पोलिसांच्या हाती लागल्याने थोरवे कुटुंबीयांनाही धक्का बसला आहे. आळंदी पोलिसांनी आरोपीचे पितळ उघडे पाडत आरोपीला अटक केले असून आरोपी सुभाषवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे. आळंदी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल गोडसे हे पुढील तपास करत आहेत.