
बांधकाम साईटवरील कामावरून दोन गटात तुफान हाणामारी
पुणे लाईव्ह । ६ जानेवारी २०२३ । बांधकाम साईटवरील कामावरून दोन गटात तुफान मारामारी झाली आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले असून पोलिसांनी पाच आरोपींना अटक केले आहे. हा प्रकार निगडीतील यमुनानगर येथील रेम्बो हाऊस कंन्स्ट्रक्शन साईटवर मंगळवारी (दि.3) रात्री घडला.
याप्रकरणी मच्छिंद्र सोपान धांडे (वय 42 रा.चिंचवड) यांनी गुरुवारी (दि.5) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून काळू भानूदास धांडे (वय 50), दिगंबर काळू धांडे (वय 26), राहूल काळु धांडे (वय 22), दत्ता राजू पिटेकर (वय 19) व सुनिल काळु धांडे (वय 24) सर्व राहणार चिंचवड या पाच जाणांना निगडी पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादी व त्यांचा मुलगा लखन धांडे (वय 27) हे बांधकाम साईटवर काम करत असताना आरोपी यांनी संगणमत करून तू या साईटवर कसे काय काम करतो? असे म्हणत फिर्यादीस शिवीगाळ केली. तसेच हाताने व लाथा बुक्क्याने मारहाण केली व फिर्यादीच्या डोक्यात कोयत्याने मारले. यावेळी लखन मध्ये पडला असता लखनला देखील कोयत्याने हातावर, डोक्यावर मारून जखमी केले.
तर मच्छिंद्र धांडे, लखन व सोपान धांडे व त्यांचे दोन साथीदार यांच्या विरोधात सुनिल धांडे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, फिर्यादीत म्हटले आहे की, सुनिल हे बांधकाम साईटवर बॉबकॅट मशीन चालवत असताना मच्छिंद्र, लखन, सोपान हे तिथे आले व त्यांनी सुनिल यांना तुझी मशीन काढून घे या साईटचे काम आम्ही घेतले आहे, असे म्हणून शिवीगाळ करत दगडाने व लाकडी दांडक्याने सुनिल याला मारहाण केली. निगीडी पोलीस ठाण्यात दोन्ही गुन्हे दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.