PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

आईस्क्रीम खाण्यावरून पत्नी आणि मुलांकडून मारहाण

पुणे लाईव्ह I ८ डिसेंबर २०२२ I  रात्रीचे जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम खाण्यावरून एका कुटुंबात वाद रंगला. याच वादातून दोन मुलांनी आणि पत्नीने मिळून आपल्याच वडिलांना आणि पतीला बेदम मारहाण केली. फिर्यादीच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला आहे. चंदन नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वडगाव शेरीत 1 डिसेंबर रोजी हा प्रकार घडला.

याप्रकरणी सचिन श्रीधर जाधव (वय 51) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यांच्या पत्नी शामला सचिन जाधव आणि मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, 1 डिसेंबरच्या रात्री फिर्यादीच्या मुलांनी आईस्क्रीम आणले (Vadgaon Sheri) होते. मी चार चपात्या खाणारा माणूस आहे. या आईस्क्रीमने माझे पोट भरणार नाही, असे म्हणून फिर्यादी यांनी ठेवलेले आईस्क्रीम फेकून दिले होते. याचा राग आल्याने पत्नी आणि मुलांनी मिळून फिर्यादीचे डोके भिंतीवर जोरजोरात आपटले आणि त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेनंतर दोन दिवसांनी फिर्यादी यांचे डोके दुखू लागल्याने ते हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांनी आपल्याच पत्नी आणि मुलांविरोधात तक्रार दिली.. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.