PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

भामा-आसखेड धरणामधून चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी

पुणे लाईव्ह I १९ डिसेंबर २०२२ I पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत भामा-आसखेड धरणामधून चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत 8.8 किलोमीटर लांबीची उंदचन जलवाहिनी (रायझिंग लाईन) आणि 18.90 किलोमीटर लांबीची गुरूत्व जलवाहिनी (ग्रेव्हीटी लाईन) अशी एकूण 27.70 किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. शहराबाहेरून टाकण्यात येणारी ही जलवाहिनी खेड आणि मावळ तालुक्यातील सहा गावांमधून येणार आहे. त्यासाठी भुसंपादन केले जाणार आहे.

पिंपरी – चिंचवड शहराचा लोकसंख्यावाढीचा वेग आणि भविष्यातील सन 2031 पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन महापालिकेकडून सरकारला आंद्रा व भामा आसखेड धरणातून पाणी आरक्षित करण्यासाठी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार, सरकारने आंद्रा धरणातून 36.87 दशलक्ष घनमीटर आणि भामा आसखेड धरणातून 60.79 दशलक्ष घनमीटर असे एकूण 97.66 दशलक्ष घनमीटर पाणी कोटा आरक्षणास 24 ऑक्टोबर 2018 रोजी मान्यता दिली आहे. या पाण्याचा वापर शहरात नव्याने विकसित होणार्‍या चिखली, चर्‍होली, वडमुखवाडी, दिघी आणि मोशी परिसरासाठी होणार आहे. महापालिकेने यापूर्वी आंद्रा व भामा-आसखेड धरणातून पाणी आणण्याच्या कामासाठी डीआरए कन्सल्टंट यांची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे. या दोन्ही कामांचा अर्थसंकल्प डीआरए कन्सल्टंट या सल्लागारामार्फत तयार करण्यात आला आहे.