
वृत्तछायाचित्रकाराला बेदम मारहाण
पुणे लाईव्ह I १७ डिसेंबर २०२२ I रहिवासी इमारतीच्या प्रवेशद्वाराभोवती पत्रे लावून केलेल्या अतिक्रमणाला विरोध करणाऱ्या एका वृत्तछायाचित्रकाराला तीन ते चार जणांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी वृत्तछायाचित्रकार अमित रुके यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंढवा येथील प्रियंका रेसिडेन्सी येथे शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार घडला. प्रियंका रेसिडेन्सी अपार्टमेंटच्या तळमजल्याला व्यावसायिक गाळे आहेत. यामधील काही गाळेधारकांनी पत्र्याचे शेड उभारून अतिक्रमण केले आहे. त्याचा अपार्टमेंटमधील रहिवाशांना वाहने ने-आण करणे आणि पार्किंग करताना अडथळा होत आहे; त्यामुळे रुके यांच्यासह इतर रहिवाशांनी महापालिका प्रशासनाकडे अतिक्रमणविरोधी तक्रार केली होती.
अतिक्रमण हटविण्यात यावे, यासाठी सातत्याने पाठपुरावादेखील करीत होते. त्यानुसार शुक्रवारी दुपारी महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक आणि पोलिसांचे पथक कारवाईसाठी दाखल झाले होते. त्यांची कारवाई सुरू होण्यापूर्वीच तीन ते चार जणांनी रुके यांच्या वडिलांना मारहाण केली. ते पाहून रुके आणि त्यांची आई मदतीसाठी धावून गेले असता, त्यांनाही जबर मारहाण करण्यात आली. मारहाण करणाऱ्याने लोखंडी हत्याराने रुके यांच्या डोक्यात मारले आणि त्यांचे डोके फरशीवर आपटून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असे तक्रारीत नमूद आहे.