
कोयता घेऊन दहशत माजविणारा जेरबंद
पुणे लाईव्ह I १० डिसेंबर २०२२ I हातात कोयता घेऊन येणाऱ्या जाणाऱ्यांना शिवीगाळ करत दहशत पसरविणाऱ्या तरुणाला तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी पावणे पाच वाजता गोळवणकर मैदानाजवळ तळेगाव दाभाडे येथे करण्यात आली.
वैभव रामकृष्ण विटे (वय 26, रा. तळेगाव दाभाडे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार विकास तारू यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक तरुण कोयता घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी कारवाई करत वैभव विटे याला ताब्यात घेतले.वैभव हा शिवाजी चौक तसेच गोळवणकर मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर थांबून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडवून शिवीगाळ करत होता. तो सार्वजनिक शांततेचा भंग करत असल्याने त्याच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.
