
कडूस आरोग्य केंद्र सलाईनवर
पुणे लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२२ । कडूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदांमुळे आरोग्यसेवा सलाईनवर असून, आरोग्यसेवा कोलमडली आहे. त्याचा फटका गोरगरीब रुग्ण तसेच गरोदर महिलांना बसत आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात कडूस हे सर्वांत मोठे आरोग्य केंद्र असून, जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे या विभागांतर्गत येणार्या रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. दोन डॉक्टरांची गरज असताना येथे एकच वैद्यकीय अधिकारी आहे. विशेषतः आरोग्यसेविकाच नसल्याने आरोग्यसेवेचा बोजवारा उडाला आहे. सेवेत असणार्या वैद्यकीय अधिकार्यांसह सेविकेला सेवा देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
कडूस मुख्यालय प्राथमिक आरोग्य केंद्रात व अंतर्गत येणार्या उपकेंद्रांत १० जागा रिक्त असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रात वेळेत उपचार मिळत नसल्याने गारेगरीब जनतेला खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत आहे.
कडूस प्राथमिक आरोग्य केंद्र मुख्यालयात वैद्यकीय अधिकारी १, आरोग्यसेवक १, आरोग्यसेविका १, परिचर १ आदी जागा रिक्त आहेत. शासन जागा भरेल तेव्हा भरेल. मात्र, सध्या कडूस आरोग्य केंद्रात तात्पुरती आरोग्यसेविकेची तरी जागा भरा, अशी मागणी नागरिक करीत आहे.