
कॉंग्रेसला सोबत घेऊनच राजकारण करावे लागणार – शरद पवार
पुणे लाईव्ह I २९ डिसेंबर २०२२ I भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 138 व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी तब्बल 24 वर्षांनंतर काँग्रेस भवन येथे भेट देत काँग्रेस नेत्यांना शुभेच्छा दिल्या. कॉंग्रेसच्या धोरणांबाबत मतभेद असतील, माझेही काही आहेत. पण कॉंग्रेसला सोबत घेऊनच राजकारण करावे लागेल, असं यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले.
आज अनेक वर्षांनी मी कॉंग्रेस भवनामध्ये आलो आहे. त्याकाळी कॉंग्रेसमध्ये अनेक नेते कार्यरत होते. पुणे म्हणजे कॉंग्रेस आणि कॉंग्रेस म्हणजे पुणे असे समीकरण होते. स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसचे केंद्र इथे होते. महाराष्ट्र प्रदेशचा कारभार या वास्तूमधूनच चालायचा. इथुन कॉंग्रेसच्या नेत्यांनी इंदिरा गांधीच्या माध्यमातून नेहरुंना कन्व्हीन्स केलं आणि संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यामध्ये पुण्यातील कॉंग्रेस भवनचे योगदान मोठे आहे. असं यावेळी शरद पवार म्हणाले.